मत्तयकृत शुभवर्तमान १०:३४-३६ चा अर्थ

                 काही लोक आहेत जे येशू ख्रिस्ताचा व बायबलचा तिरस्कार करतात आणि नेहमी येशू ख्रिस्ताला व बायबलला चुकीचे/ खोटे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. हे ते लोक आहेत जे कधी स्वतः बायबल वाचून हे शोधत नाहीत की येशू कोण आहे, बायबलमध्ये काय लिहिले आहे. हे ते लोक आहेत की जे इंटरनेटवर  येणाऱ्या गोष्टी, फेसबुकवर येणारे फोटो आणि युट्यूब वर येणाऱ्या विडीओवर विश्वास ठेऊन ख्रिस्ती लोकांसोबत वादविवाद करण्यासाठी जातात व त्यांना चुकीचे सिद्ध करण्याचे प्रयत्न करतात. आणि ते हे देखील सांगण्याचा प्रयत्न करतात की बायबल चुकीचे आहे, येशू चुकीचे आहेत व ख्रिस्ती धर्मही चुकीचा आहे. आणि ते लोक थोडासा वेळ काढून हे देखील नाही शोधत की त्यांनी केलेली विधाने बरोबर आहेत किंवा चुकीची आहेत. असेच एक उदाहरण आपण आधीच्या विडीओमध्ये [क्या यीशु ने जिहाद सिखाया? (लुका १९:२७)] बघितले की जेथे एक हिंदू धर्मगुरू व एक मुस्लीम प्रचारकर्त्याने लूककृत शुभवर्तमानातील १९:२७ वचनाला चुकीच्या रीतीने प्रस्तुत केले होते. आम्ही त्या व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, त्या वचनाचा संदर्भ कसा समजून घ्यावा. परंतु काही लोकांनी ठरविलेच आहे की, तुम्ही कितीही समजवा, आम्ही समजून नाही घेणार, कितीही पुरावे सादर करा आम्ही आमचे डोळे बंद करून घेऊ आणि सत्य बघणार नाही. हे ते लोक आहेत जे येशू ख्रिस्ताचा तिरस्कार करतात. हे ते लोक आहेत जे सत्याशी वैर ठेवतात आणि प्रकाशाला घाबरतात. 

            असेच एक उदाहरण आज आपण बघू, जे आपण मत्तयकृत शुभवर्तमान १०:३४-३६ मध्ये वाचू शकतो. काही लोक हे वचन दाखवितात आणि असे म्हणण्याचा प्रयत्न करतात की येशू शांतीचा राजकुमार नाही, येशू ख्रिस्त या जगात लोकांना एकमेकांविरुद्ध भडकविण्यासाठी आले आहेत. तर चला आपण हे वचन बघू आणि या वचनाचा अर्थ समजून घेऊ. मत्तयकृत शुभवर्तमान १०:३४-३६. “३४ मी पृथ्वीवर शांतता आणावयास आलो असे समजू नका; मी शांतता आणावयास नव्हे, तर तरवार चालवावयास आलो आहे. ३५कारण ‘मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू, यांत विरोध’ पाडण्यास मी आलो; ३६आणि ‘मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील.’ तर या वाचनात येशू म्हणतात की तुम्ही हा नका विचार करू की मी शांती देण्यासाठी आलो आहे आणि शांती घेऊन आलो, परंतु मी तलवार चालवावयास आलो आहे, लोकांना एकमेकांविरुद्ध उभे करण्यासाठी आलो आहे. तर या वचनाचा अर्थ काय आहे? काय येशू शांतीचा राजकुमार आहे? जसे जुन्या व नवीन करारामध्ये काही वचनांत आपण वाचतो की, JESUS CHRIST is the prince of peace. जर येशू ख्रिस्त शांतीचा राजकुमार आहे, शांतीचा दाता आहे आहे, येशूने जगामध्ये शांती आणली आहे, लोकांना प्रेम शिकविण्यासाठी येशू आले आहेत तर का येशूने या वचनात असे म्हटले की मी लोकांना एकमेकांविरुद्ध उभे करण्यासाठी आलो आहे? आणि असे नका समजू की मी शांती आणली आहे; परंतु मी तलवार चालवावयास आलो आहे. 

                पुढे जाण्याआधी मी तुम्हाला एका घटनेची आठवण करून देऊ इच्छितो, गेथशेमाने बाग! ह्या गेथाशेमाने बागेत जेव्हा येशूला अटक करण्यासाठी सैनिक येतात, तेव्हा येशूच्या शिष्यांपैकी एक शिष्य पेत्र, आपला चाकू काढून एका सैनिकाचा कान कापतो. येशू ख्रिस्ताने तेथे काय केले? पेत्राला असे म्हणून शाबासकी दिली का, की “खूप छान पेत्रा! तू माझ्या संरक्षणासाठी एका सैनिकाचा कान कापलास. खूप चांगले काम केलेस तू.” अर्थातच नाही. येशू ख्रिस्ताने तेथे पेत्राला चांगली समज दिली आणि म्हणाले की, “जो तलवार धरतो त्याचा तलवारीने नाश होईल.” तर येशू ख्रिस्त तेथे तलवारीचा विरोध करतात, पेत्रावर रागावतात आणि येथे तर असे म्हणतात की मी शांती आणण्यासाठी आलो नाही परंतु तलवार चालवावयास आलो आहे. तर ह्याचा अर्थ काय होतो? मित्रांनो, मी नेहमी व्हिडीओ मध्ये सांगतो की जेव्हा येशू ख्रिस्त सुवार्ता सांगतात, तेव्हा ते कोणत्या रीतीने सांगतात, त्याचा संदर्भ काय आहे हे जाणून घेणे जरुरीचे आहे. येशू ख्रिस्त कशाप्रकारे सुवार्ता सांगतात हे जाणून घेण्याआधी आपण हे बघू की जेव्हा एखादा सामान्य माणूस बोलतो तर तो कशाप्रकारे बोलतो. जेव्हा एखादा व्यक्ती चांगले शौर्याचे काम करतो तेव्हा दुसरा व्यक्ती त्याला उद्देशून म्हणतो की हा तर वाघ आहे, असे तुम्ही ऐकले असेल. तर जेव्हा तो व्यक्ती म्हणतो की हा वाघ आहे तर ह्याचा अर्थ असा होतो का की, तो माणूस खरच वाघ आहे? आणखी जेव्हा आपण तरुण लोक चर्च मध्ये जातो तेव्हा ज्येष्ठ लोक आपल्याला बघून असे म्हणतात की तुम्ही चर्चचे खांब आहात. तर ह्याचा अर्थ असा आहे का की, खरच आपण चर्चचे खांब आहोत? उंच, अरुंद खांब आहोत? अर्थातच नाही. जेव्हा कधी लोक बोलताना कोणाला बघून असे म्हणतात की तू वाघ आहेस, तुम्ही खांब आहात, तेव्हा त्या शब्दांचा शब्दशः अर्थ नाही घेतला जात तर त्या शब्दांतून ती व्यक्ती काय दर्शविण्याचा, काय सांगण्याचा प्रयत्न करते हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीचे शौर्य दर्शविण्यासाठी त्याला वाघ म्हटले जाते. एखाद्या तरुण व्यक्तीला चर्चमध्ये आधारस्तंभ म्हटले जाते कारण भविष्यात ती व्यक्ती चर्चचा मुख्य व्यक्ती बनते. तसेच जेव्हा येशू ख्रिस्त सुवार्ता सांगतात तेव्हा ते ही काही गोष्टी समजावून सांगण्यासाठी अशा अनेक शब्दांचा वापर करतात. 

            या वचनात येशू ख्रिस्त म्हणाले की तलवार चालविण्यासाठी मी आलो आहे. तर आपण हे समजून घेणे गरजेचे आहे की तलवार या शब्दाचा अर्थ काय आहे? तो शब्द काय दर्शवितो? जेव्हा तलवारीविषयी बोलतो तेव्हा तलवार कशासाठी वापरतात? दुभागण्यासाठी, वेगळे करण्यासाठी. पुढचे वचन सांगते की मुलगा बापाविरुद्ध, मुलगी आईविरुद्ध, सून सासूच्या विरोधात असतील. मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की एखादी विधर्मी व्यक्ती, येशू ख्रिस्ताचे प्रेम पाहून, येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील अवस्थेला, बलिदानाला पाहून, प्रभावित होऊन असा विचार करते की, येशू ख्रिस्त माझ्यावर किती प्रेम करतो, अशा परमेश्वराला आणि मुक्तीदात्याला मी कसा सोडू शकतो असे म्हणून ती व्यक्ती अचानक येशू ख्रिस्ताचा स्विकार करते आणि येशू ख्रिस्ताकडे येते तर, काय त्या व्यक्तीच्या घरातील लोक त्याला मेजवानी देतील? त्याचे कौतुक करतील? असे म्हणतील का की, “अरे वा मुला, मी तुझे इतके २०-२५ वर्षे पालन-पोषण केले, इतक्या वर्षांपासून तू नमाज करत होतास, भगवद्गीता वाचत होतास, आज तर तू ख्रिस्ती बनलास! तुझे तर कौतुक करायला पाहिजे.” असे त्यांचे कौतुक करतील का? नाही! त्या कुटुंबातील लोक ख्रिस्ती बनलेल्या व्यक्तीच्या विरोधात उभे राहतील. हा आहे या वचनाचा अर्थ! आणि त्या व्यक्तीच्या घरातील लोकांना असे वाटेल की हा इतके वर्ष आमच्यासोबत होता आणि आज स्वतः निर्णय घेऊन आमच्या विरोधात उभा राहिला आहे. तर हे वचन जे सांगते की मुलगा बापाविरोधात उभा राहील म्हणजेच उदाहरणार्थ असे माना की जर बापाने येशूचा स्वीकार केला किंवा मुलाने येशूचा स्वीकार केला तर असे होऊ शकते की बापाला वाटेल की माझा मुलगा माझ्या विरुद्ध उभा आहे आणि मुलाला वाटेल की माझे वडील माझा विरोध करत आहे. कारण त्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणे. 

            मित्रांनो, आपण असे अनेक उदाहरणे बघू शकतो की जेथे घरातील लोकांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारलेल्या व्यक्तीचा खून देखील केला आहे. आपण असेही उदाहरणे बघू शकतो की जेथे येशू ख्रिस्ताचा स्वीकार केल्यामुळे त्या व्यक्तीला घरातून हाकलून दिले जाते. तर हे वचन ज्यात येशू ख्रिस्त तलवार म्हणतात ती खरी तलवार, खरा चाकू दर्शवित नाही, तर जेव्हा आपण येशू ख्रिस्ताचा स्वीकार करू तेव्हा जगातील लोक आपला तिरस्कार करतील हे दर्शविते. तर आता ह्याचा अर्थ असा होतो का की येशू ख्रिस्ताने या जगात शांती नाही आणली? येशू ख्रिस्त या जगात शांती घेऊन आले. ते म्हणतात की जो कोणी तुमचा तिरस्कार करतो त्याच्यासाठी प्रार्थना करा. जर कोणी तुझ्या एका गालावर मारतो त्याला दुसराही गाल दे. जर कोणी तुला एक कोस घेऊन जातो त्याच्यासोबत दुसराही कोस जा. तर येशू ख्रिस्त शांती जरूर शिकवितात, परंतू जेव्हा ते बायबलमध्ये शांतीविषयी बोलतात तेव्हा आपण हे जाणून घेणे गरजेचे आहे की ते कोणत्या शांतीविषयी बोलतात. उत्पत्तीच्या पुस्तकात पहिल्या व दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघतो की मनुष्य पापामुळे परमेश्वराच्या शांतीला गमावतो. आणि आपण रोमकरांस पत्र ५:६ मध्ये हे वाचतो की येशू ख्रिस्तामुळे आणि येशू ख्रिस्ताने केलेल्या बलिदानामुळे आपण परमेश्वराशी गमावलेल्या नात्यामध्ये परत जोडले जातो आणि परमेश्वर आणि मनुष्यामध्ये शांती प्रस्थापित होते. जेव्हा मनुष्य परमेश्वराशी एकोपा साधतो तेव्हा काय होईल मित्रांनो? प्रकाशाचे युद्ध अंधाराशी होईल, दुष्टाइचे युद्ध चांगुलपणाशी होईल. उदाहरणार्थ, एक व्यक्ती खूप वाईट होता, तो मित्रांसोबत लोकांसाठी अपशब्द वापरायचा, दारूचे व्यसन करायचा, चुकीचा हिशोब लिहायचा असा व्यक्ती अचानक येशू ख्रिस्ताचा स्वीकार करून बदलून जाईल. त्याला त्या सर्व गोष्टी सोडाव्या लागतील ज्या त्याला पापात घेऊन जातात. तर त्याने येशूचा स्वीकार केल्यामुळे त्याचे मित्र त्याच्याशी वैर ठेवतील का? त्याच्याविरुद्ध उभे राहतील का? आणि असाही विचार करतील का की ह्याने चुकीचा हिशोब लिहिणे सोडून दिले आहे, ह्याच्यामुळे आम्ही फसू, हा तर आमच्या विरोधात उभा आहे. तर हे वचन हे दर्शविते की जेव्हा आपण येशू ख्रिस्ताच्या जवळ जाऊ तेव्हा लोक आपला तिरस्कार करतील आणि त्यांनाच असे वाटेल की आपण त्यांचा तिरस्कार करतो. परंतु मित्रांनो सत्य तर हे आहे की आपण येशू ख्रिस्तासोबत एकोप्यात येतो तेव्हा आपल्यामध्ये आणि या जगातील लोकांमध्ये फरक असेल. आणि ह्या फरकाला जग स्वीकारू शकत नाही. जसे आपण योहानकृत शुभवर्तमानातील पहिल्या अध्यायात वाचतो की येशू ख्रिस्ताला देखील त्यांच्या स्वकीयांनी स्वीकारले नाही आणि येशू ख्रिस्ताच्या आगमनापासूनच त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांमध्ये तलवार आली. 

            मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी जेव्हा २००७ मध्ये येशू ख्रिस्ताला पूर्णपणे स्वीकारले आणि एके दिवशी सायंकाळी प्रार्थनेहून घरी आलो तेव्हा माझ्या कुटुंबीयांनी माझ्या कपड्यांची बॅग भरून ठेवली होती आणि जसे मी दरवाजामध्ये आलो त्यांनी ती बॅग माझ्याकडे देऊन म्हणाले की तू घरातून निघून जा. तर मला त्यावेळी असे वाटले की माझे घरातील लोक माझ्याविरुद्ध उभे राहिले आहेत. आणि माझ्या घरातील लोकांना असे वाटले की इतके वर्षे आम्ही ह्याचे पालन-पोषण केले परंतु आता ह्याने येशू ख्रिस्ताला पूर्णपणे स्वीकार करून त्यांच्या मार्गावर चालला आहे, प्रार्थना करतो आहे. त्यांना असे वाटत होते की मी त्याच्या विरुद्ध झालो आहे. तर मित्रांनो या वचनाद्वारे येशू ख्रिस्त हेच दर्शविण्याचा प्रयत्न करत आहेत; ते असे नाही म्हणत की तुम्ही जाऊन कोणाचा खून करा, एकमेकांसोबत भांडण करा. जेव्हा लोक तुमचा तिरस्कार करतात, तेव्हा येशू ख्रिस्ताने योहानकृत शुभवर्तमान १५:१८ मध्ये सांगितलेली गोष्ट लक्ष्यात ठेवा की तुम्ही निश्चिंत राहा व समजून घ्या की लोकांनी तुमचा तिरस्कार करण्याआधी येशू ख्रिस्ताचा तिरस्कार केला आहे. तर शांती म्हणजे परमेश्वर आणि मानव यांच्या नात्यातील शांती. या वचनाचा अर्थ आणि संदर्भ हा आहे. जे लोक फक्त इंटरनेटच्या आधारावर आहेत, येशू ख्रिस्ताची बदनामी करण्याची संधी बघत असतात ते लोक हे सत्य ऐकतील तरीही ते हे सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करणार नाहीत. कमेंटमध्ये परत अपशब्द वापरतील. आपण या जगात येशू ख्रिस्ताच्या प्रेमासाठी जगात आहोत, परंतु त्याचवेळी आपण या जगाशी एकोप्याने नाही राहू शकत. या जगातील पापासोबत एकोपा नाही ठेऊ शकत. जेव्हा आपण या जगातील लोकांसोबत एकोपा नाही साधू शकत तेव्हा त्यांना वाटेल की आपण त्यांच्या विरोधात झालो आहे, आणि म्हणून ते आपल्या विरोधात होतील. हा आहे मत्तयकृत शुभवर्तमान १०:३४-३६ चा अर्थ. तर ही आनंदाची बातमी आहे. जेव्हा येशू म्हणतात की मी तलवार चालवावयास आलो आहे, तर ती तलवार कोणामध्ये आहे? ती तलवार अंधाराच्या आणि प्रकाशाच्या मध्ये आहे. ती तलवार वाईटपणाच्या आणि चांगुलपणाच्या मध्ये आहे. आणि ही तलवार चांगली आहे. तुम्ही शब्दाला त्याच्या संदर्भामध्ये समजून घ्या.

प्रभू येशू तुम्हाला आशीर्वादित करो!


Credits: Original Video: https://youtu.be/_-ncqh2p_rE

Transcripted by: Bharti Waghmare

1 comment:

Thank you for reading this article/blog! We welcome and appreciate your opinion in the comments!